Sunday, 23 February 2020

मी शिवाजी


एखादी 'संकल्पना' विचारविमर्ष करून अमलात आणायची, ही अत्यंत अवघड किंबहुना जवळजवळ अशक्य अशी गोष्ट असते. कारण संकल्पना म्हंटलं की, ती आदर्श असणारच. पण विचार जेव्हढा आदर्श तेव्हढे त्यावर विचार करणारे किचकट किंवा तथाकथीत बुद्धीजीवी. म्हणून चांगली संकल्पना अमलात आणणे जेव्हढे अवघड नाही, तेव्हढे त्या संकल्पनेला मूर्त रूप देणे अवघड कार्य असते.

परंतु तिच संकल्पना जर कुठलाही विचारविनिमय न करता प्रत्यक्ष उदाहरणांमधून समोर मांडली तर ती सिद्ध होते. जगमान्य होते. त्यातही उदाहरण केवळ एकटे-दुकटे असेल तर परत अवहेलना होते. कारण त्याकडे 'अपवाद' म्हणून पाहिला जातो. पण हेच जर अनेकदा एक-दोन नव्हे तर हजारो उदाहरणांमधून सिद्ध होत असेल, तर ती संकल्पना खऱ्या अर्थाने परिणामकारक आणि फलदायी असते. किंबहुना आचारणीय असते. आणि अशीच प्रत्यक्ष अनुभूतीतून आचरणातून साकारलेली संकल्पना म्हणजे 'मी शिवाजी'.

जिची प्रत्यक्ष अनुभूती हजारो मावळ्यांनी घेतली. अर्थात हजारो मावळे 'मी शिवाजी' ही संकल्पना शब्दशः जगले. या ठिकाणी प्रत्यक्ष शिवाजी महाराजांना राष्ट्रनिष्ठा, धर्मनिष्ठा, स्वराज्य, सुराज्य यापैकी कुठल्याही गोष्टी समजावून सांगाव्या लागलेल्या नाहीत. त्याचे महत्त्व आणि काळाची गरज ही पटवून द्यावे लागलेली नाही. ती गोष्ट स्वतःत विद्यमान होती. स्वतःची साधना, तपस्या एवढी होती की, ती अनेकांनी स्वयंप्रेरणेने स्वीकारली.

कदाचित देव देखील देवाचे देवत्व अबाधित ठेवतो, ते परमतत्वाचे नित्य ध्यान करून. हीच जर गोष्ट पुढे मांडली तर लक्षात येते की प्रत्यक्ष शिवाजीमहाराजांनीही तेच केले. तीनशे वर्षांची काळरात्र पसरलेल्या, यावनी संकटांनी गाजलेल्या समाजाला जागृत करणे केवळ एक राजा म्हणून नावारूपाला येऊन कार्य करणे शक्य नव्हते. नव्हे असा करण्याचा प्रयत्नही अनेक राजांनी केलेला होता. परंतु शिवाजीमहाराजांचे वेगळेपण होते. आणि ते म्हणजे 'शिवंभुत्वा शिवं यजेत'.

अर्थात प्रत्यक्ष शंकराला प्राप्त करायचे असेल, तर स्वतः शंकर होऊन शंकराची आराधना करावी लागते. अर्थात जी गोष्ट साध्य करायची आहे तिच्यासाठी केवळ पात्र होणे एव्हढेच नव्हे तर, ती गोष्ट मिळवण्याकरिता ची सर्व प्रकारची सिद्धता असणे, ती गोष्ट स्वतःहोऊन. आणि म्हणूनच की काय, हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलं ते रायरेश्वराला अर्थात 'शिवा'चा अभिषेक 'शिवा'ने करुन. ही घटनाच 'मी शिवाजी' संकल्पना सांगण्यासाठी पुरेशी आहे.

या ठिकाणी शिवाजीमहाराजांना देवत्व बहाल केले गेले तर त्यासारखे दुर्दैव कोणतेही असणार नाही. कारण एखाद्या महापुरुषाला देवत्व दिले की, आपण केवळ त्याचे गुणगान गाऊन, त्याचा उत्सव साजरा करण्यात धन्यता मानतो. परंतु शिवाजी महाराज रयतेचे राजे होते. जाणते राजे होते. 'आधी केले, मग सांगितले', हे देखील त्यांनी केले नाही. तर स्वतः सिद्ध होऊन, उदाहरण म्हणून उभे ठाकले. आणि इतरांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन स्वतः तसे बनण्याचा यशस्वी प्रयत्न केला.

शिवाजीमहाराजांचे मावळे 'मी शिवाजी' म्हणुन जगले. शिवाजीमहाराजां इतकीच ध्येयनिष्ठा, सामर्थ्य, साहस आणि समर्पणाचा भाव त्यांच्यातही होता. म्हणूनच अत्यंत कमी कालावधीमध्ये हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकारले गेले. प्रसंगी शिवाजीमहाराजांवर कोणतेही संकट न येऊ देता स्वतःचे प्राणार्पण केले. संकटे स्वतःच्या छातीवर झेलली परंतु मूळ शिवाजीमहाराजांना धक्का लागू दिला नाही. शिवचरित्रामध्ये अशी मावळ्यांची नावे घ्यायची झाल्यास एक पुस्तकही कमी पडेल.

खरंतर 'शिवचरित्र' आणि 'शिवकथा' उभ्या महाराष्ट्राला ठाऊक आहेच. पण शिवचरित्र कथन करणे किंवा ऐकणे, यात भागवताचे पारायण करून पुण्य मिळण्यासारखा उद्देश नसून ते आचरण करण्याची प्रेरणा मिळणे अपेक्षित आहे.

पण तथाकथीत बुद्धीजीवी समाजाचे प्रतिनिधी म्हणून विचार करतो की, 'शिवाजी इतरांच्या नाही तर माझ्या घरात जन्माला यावा'. (पूर्वी तर हा देखील विचार नसायचा.) आणि शिवाजी स्वतःच्या घरात जन्माला आला. तरी आपण विभक्तच. कारण 'मी शिवाजी' म्हणुन आपण पुढे येणारच नाही. संकटांचा अनुभव आणि पर्यायाने त्याकरिता करावा लागणारा त्याग आपल्याला कधी अनुभवताच येणार नाही.

खरंतर उभ्या महाराष्ट्राला शिवाजीमहाराज  सांगण्याची गरजच नाही. कारण असं गाव महाराष्ट्रात नाही, ज्यात शिवाजी नावाची व्यक्ती, शिवाजी चौक, शिवाजीनगर किंवा शिवाजीचा पुतळा नाही असे नाही. परंतु अभाव आहे तो 'मी शिवाजी' ही सिद्ध संकल्पना जगण्याचा.

म्हणूणच राष्ट्रासमोर आलेल्या संकटांकडे पाहत असताना त्यातील 'माझी जबाबदारी काय?', असे म्हणून पाहण्याची दृष्टी आली की, 'मी शिवाजी' म्हणुन संकल्पना प्रत्यक्षात अनुभवण्याचा प्रवास सुरू झाला आहे, असे होईल...

©हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९